आवाशी : घरडा केमिकल्समध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व प्रत्यक्ष आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश आले नसते तर कदाचित भोपाळसारखी किंवा त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती पाहावयास मिळाली असती, अशी प्रतिक्रिया सध्या लोटे परिसरातून व्यक्त होत आहे. कंपनीमध्ये अत्यंत ज्वालाग्रही पदार्थ असल्याने केवळ पंचक्रोशीचे दैव बलवत्तर म्हणूनच कदाचित अनेकांचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त होत आहे.
लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स लि. या कंपनीत शनिवार, दिनांक २० रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास घडलेल्या स्फोटातून निर्माण झालेली आग चारजणांचा बळी घेऊन व एकाला प्रत्यक्ष मरणाच्या दारात उभी करुन विझली असली तरी पंचक्रोशीतील रहिवाशांच्या मनात निर्माण झालेले दहशतीचे निखारे अजूनही धुमसत आहेत. ज्या प्लँट नं. ७मध्ये ही घटना घडली, तेथील सत्यता आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. यात प्रामुख्याने ज्यावेळी ही घटना घडली ती वेळ सकाळी साडेआठची होती. पहिल्या पाळीत कामावर गेलेल्या कामगारांची ही वेळ नाष्ट्याची होती. त्यामुळे घटनास्थळी उपस्थितांची संख्या ठराविक होती. मात्र, नाष्ट्यासाठी गेलेले कामगारही स्फोटाच्या आवाजाने सैरावैरा पळत सुटले. कदाचित याचमुळे जीवितहानी होण्याची संख्या वाढली नाही, अन्यथा हीच संख्या चारच्या पटीत वाढत गेली असती.
७ नंबरच्या प्लँटमध्ये ज्या रसायनांचे उत्पादन घेतले जाते किंवा उत्पादनासाठी जो कच्चा माल वापरला जातो ते सगळेच पदार्थ ज्वालाग्राही आहेत, किंबहुना त्यांची तीव्रता कमालीची आहे. कंपनीतील उपलब्ध सुरक्षा साधने व यंत्रणांच्या आधुनिकतेमुळे व ते हाताळणाऱ्या तज्ज्ञांच्या वापरामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. नाहीतर जवळपास १५ ते २० किलोमीटरचा परिसर आगीत जळून खाक झाला असता, असे मत औद्योगिक वसाहतीतील अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.