शिरगाव : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच आणि एस. ए. फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी १० वाजता हे शिबिर होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांची भेट
दापोली : कोकणातील कुणबी समाजाच्या सामाजिक व राजकीय विकासावर चर्चा करण्यासाठी येथील कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे आणि संदीप राजपुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण
आवाशी : कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीसाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतीने हे अभियान राबविताना गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण केले. यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली होती.
घरोघरी सर्वेक्षण
राजापूर : ‘माझे राजापूर शहर कोरोनामुक्त शहर’ अभियानांतर्गत गेल्या दहा दिवसात ५,३१२ नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. शहरातील आठ प्रभागांत आठ पथकांच्या माध्यमातून ही तपासणी १५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषदेचे योगदान महत्त्वाचे आहे.
भाजी विक्रेते संकटात
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या अनुषंगाने केलेल्या वेळेच्या बंधनाच्या सक्तीने भाजीविक्रेते पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेतच भाजी विकली जात आहे. मात्र नाशवंत असल्यामुळे ही भाजी वाया जात आहे. त्यामुळे विक्रीही कमी आणि भाजीचेही नुकसान अशा दुहेरी कात्रीत भाजीविक्रेते अडकले आहेत.
मशागतीची पूर्वतयारी
साखरपा : संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या भातशेतीच्या मशागतीच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृग नक्षत्राच्या मूहुर्तावर पेरणीला सुरुवात होणार आहे. गेल्या महिन्यात भाजावळ बहुतेक ठिकाणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता शेतकरी या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या पेरणीकडे लक्ष देऊ लागेल.
हॉटेल्स बंदमुळे गैरसोय
देवरुख : लॉकडाऊन काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अनिश्चित काळासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र सध्या रुग्णालयांच्या परिसरात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र हॉटेल्स बंद असल्याने त्यांना खाण्याचे पदार्थ मिळताना अडचण येत असल्याने काहीवेळा उपासमार होत आहे.
लसीकरण केंद्र सुरू
राजापूर : तालुक्यातील करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळवडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन तळवडेचे सरपंच प्रदीप प्रभूदेसाई यांच्याहस्ते झाले. पहिल्याचदिवशी १५० व्यक्तींना लस देण्यात आली.
घरोघरी सर्वेक्षण
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथे कोरोनाच्या अनुषंगाने ‘माझी रत्नागिरी, माजी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सरपंच कीर्ती घाग, ग्रामसेविका साधना शेजवळ, माजी सरपंच सचिन नवरंग, सुचिता सावर्डेकर यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे.
रुग्णांना दिला धीर
गुहागर : गुहागर तालुका ग्रामसेवक संघटनेने वेळणेश्वर येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांना धीर दिला. गटविकास अधिकारी अमोल भोसले आणि सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ह उपक्रम राबविण्यात आला.