शिरीष नाईक -कसई-दोडामार्ग येथील संजय खांबल हे १३ वर्षे अंधारात असल्याने त्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महावितरणच्या अधिकारी यांना दिले होते. मात्र, एक महिना उलटला तरी वीजजोडणी देण्यात आली नाही. यामुळे मंत्र्यांच्या आदेशालाही न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांची मनमानी वाढतच आहे. पालकमंत्री केसरकर यांनी वीज अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे.कसई - दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील संजय खांबल यांच्या घरात १३ वर्षे वीज नाही. यामुळे ते अंधारात जीवन जगत आहेत. मुलांचे शिक्षण, घरकामे हे सारे दिव्याखालीच सुरू आहे. त्यामुळे खांबल कुटुंब अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने २१ मे रोजी प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचून सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्यांतून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, वीज जोडणीला विरोध करण्यात आल्याने अधिकारी हातावर हात ठेवून गप्प राहिले. त्यानंतर ५ जून रोजी दोडामार्ग येथे आमसभा झाली. या सभेमध्ये संजय खांबल यांनी याबाबत आवाज उठविला. १३ वर्षे आम्ही अंधारात आहोत, अधिकारी वीज जोडणी करत नाही, असे सांगितले. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधितांना विचारले. आमसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व विरोधक असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना वीज जोडणीला विरोध नको, जर कोणी विरोध करत असेल तर पोलिसांचा बंदोबस्त घ्या आणि त्वरित वीज जोडणी द्या. असा विषय पुन्हा आपल्याकडे येता कामा नये, असे आदेश वीज अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. तरीही वीजजोडणी मिळालेली नाही.अधिकारी उद्धटपणे वागतातदरम्यान, या घटनेला महिना होऊनसुद्धा अद्यापपर्यंत वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री महोदयांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा गंभीर आरोप संजय खांबल यांनी केला आहे. यामुळे अधिकारी मनमानी कारभार करतात हे उघड झाले आहे. मंत्र्यांच्या आदेशाचे पालन न करता उलट हे अधिकारी उद्धटपणे वावरत आहेत. यावर पालकमंत्री केसरकर कोणती भूमिका घेणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
केसरकरांच्या आदेशाला अक्षता
By admin | Updated: July 9, 2015 23:54 IST