लांजा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित यशवंतराव यांच्या प्रचारार्थ लांजा बसस्थानकात सादर करण्यात येत असलेल्या पथनाट्यावर शहर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शासकीय जागेत सुरु असलेले पथनाट्य तहसीलदारांनी तत्काळ बंद करण्यास भाग पाडले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता घडली.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित यशवंतराव यांनी आपल्या प्रचारासाठी पथनाट्याचा नवीन फंडा काढत गुरुवारी लांजा, राजापूर, साखरपा, भांबेड या ठिकाणी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पथनाट्याद्वारे प्रचार सुरु केला होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामराव पानवलकर यांनी लांजा एस. टी. स्टँड, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर, योगी हॉटेलच्या बाजूला, लांजा बाजारपेठ, रिक्षा गल्ली, राजापूर जवाहर चौक, एस. टी. स्टँडजवळ, साखरपा एस. टी. स्टँड, भांबेड पेठदेव येथे पथनाट्याद्वारे प्रचार करण्याची परवानगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मागितली आणि तशी परवानगी त्यांनी दिली असल्याचे त्यांच्या परवानगीपत्रात क्रमांक वि. ति. २०१४/अ. क्र.५९/१०/१४ नमूद आहे. त्याप्रमाणे अजित यशवंतराव यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता लांजा एस. टी. स्टँडमध्ये हे पथनाट्य सुरु झाले. पथनाट्य सुरु होते न होते तोच आगार व्यवस्थापकांनी आक्षेप घेतला. तत्काळ शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी तहसीलदारांकडे आक्षेप घेतला आहे.शासकीय मालमत्तेच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार सुरु असल्याचे लक्षात आल्यावर तहसीलदार दशरथ चौधरी यांनी हे पथनाट्य बंद करायला लावले. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यापुढे असे न करण्याबाबत तंबी दिली. मात्र, शासकीय आवारातला प्रचार पुन्हा महामार्ग क्र.६६ वर सुरुच होता. याबाबतची लेखी तक्रार शिवसेना शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपशहरप्रमुख राजेंद्र धावणे, युवासेना तालुका अधिकारी सचिन लिंगायत, युवा सेना शहरप्रमुख बाप्पा यादव, स्वरुप गुरव, बापू लांजेकर, मोहन तोडकरी, राहुल शिंदे, तात्या कुरुप, राजू हळदणकर, प्रसाद भाईशेट्ये यांनी केली आहे. याप्रकरणी आता कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या पथनाट्यावर आक्षेप
By admin | Updated: October 10, 2014 23:05 IST