राजापूर : गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या गणेशभक्तांनी दाेन डाेस घेतले असतील तर त्यांना चाचणीशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यथा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरटीपीसीआर चाचणी ऐवजी ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्याची मागणी केली. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मुंबईतून येणाऱ्या चाकरमन्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांचे दोन डोस पूर्ण झाले असतील त्यांना चाचणीशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान आरटीपीसीआर अहवाल येणास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची ॲंटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली तसेच कोविडशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस थांबावे लागत आहे. सद्य:स्थिती पाहता दुसरा डोस लगेच उपलब्ध होत नाहीत. कोविडशिल्ड पहिला डोस झालेल्या प्रवाशांची जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी ॲँटिजन चाचणी करून प्रवेश देण्यात यावा, अशीही मागणी आमदार साळवी यांनी केली हाेती.
जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांनी या चर्चेनंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असेल तर किंवा कोविडशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन पहिला डोस झाला असेल तर त्या प्रवाशांची जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी फक्त नोंद करणात येईल, असे सांगितले. त्यांच्या गावाच्या ग्रामकृती दलाकडून आवश्यकतेनुसार तपासणी केली जाईल, असे सांगितले. या निर्णयामुळे गावी येणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.