रत्नागिरी : जे. एस. डब्लू. फाऊंडेशनतर्फे ओ. पी. जिंदल जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा मर्यादित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आठवी, नववी, दहावी, अकरावी ते पंधरावी अशा चार गटांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘काहींना भिंती दिसतात तर मला तेथे दरवाजा दिसतो’, ‘ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे’, ‘लाॅकडाऊनमध्ये मी केलेले नवीन काम’, ‘एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केल्याने मला झालेले फायदे’ यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार करून कॅप्शनमध्ये आपले नाव, इयत्ता, शाळेचे नाव, आधार क्रमांक, आपला गट क्रमांक लिहून व्हाॅट्सॲपव्दारे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चारही गटातील विजेत्या प्रथम क्रमांकाला तीन हजार रुपये, व्दितीय क्रमांकाला दोन हजार रुपये, तृतीय क्रमांकाला एक हजार रुपये व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एका विद्यार्थ्याने कोणत्याही एका विषयावरील एकच व्हिडीओ पाठवायचा असून, एकदाच पाठवावा. शनिवार, दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ४.३०नंतर पाठविलेले व्हिडीओ विचारात घेतले जाणार नाहीत. स्पर्धेचा निकाल दि. ७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन कळविण्यात येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.