गुहागर : गुहागर तालुक्यासाठी वनविभागाच्यावतीने करण्यात आलेल्या वन्यप्राणी जनगणनेमध्ये तालुक्यात बिबट्यांची संख्या कायम म्हणजेच पाच एवढी आहे. दर पाच वर्षांनी जिल्ह्यात वन्य प्राण्यांची गणना वनविभागाच्यावतीने करण्यात येते. नियोजित आठ दिवसांच्या दरम्यान ही जनगणना करणे प्रत्यक्षपणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शक्य नसते. गुहागर तालुक्याचा विचार करता वनविभागाचे तीनच वनपाल कार्यरत आहेत. याबाबत परीक्षेत्र वनाधिकारी बी. आर. पाटील यांनी सांगितले की, आठ दिवसांच्या कालावधीमध्ये जंगल भागातून फिरताना जेवढे प्राणी दिसतात तेवढ्याच प्राण्यांची नोंद केली जाते. प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता यापेक्षाही प्राण्यांची संख्या अधिक असू शकते. वनविभागाकडून २०१० नंतर २०१४ ला गणना झाली. उपलब्ध आकडेवारी पाहता बहुतांशी आकडेवारी तीच असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या गणनेमधून तालुक्यात पाच बिबट्या होते. आजही ही संख्या कायम दाखवली आहे. काही महिन्यापूर्वीच गुहागर येथे फासकीत बिबट्या अडकला होता. गतवेळी एकाही मोराची व साळींदराची नोंद नव्हती. मोर ८ व साळींदर २ असल्याची नोंद आहे. गवा ४ वरुन १३ एवढी वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात गुहागर मोडकाआगर रस्त्यावरती गव्याच्या मध्ये येण्याने व धडक लागल्याने तीन दुचाकीस्वार पडून गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. शेंगदाणा व नाचणी पिकाचे गव्यामुळे तालुक्यात प्रचंड नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीमुळे गवा व वानर लोकवस्तीजवळ येवू लागल्यसाने यांचा वावर वाढला आहे. अशा स्थितीत तालुक्यात १३ गवे व फक्त ८५ वानरसंख्या हास्यास्पद मानली जात आहे. डुकरांची संख्या १४ असून वर्षभरात शिकाऱ्यांकडून शिकार झालेल्या डुकरांची संख्या ही यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्याचे काम दर पाच वर्षांनी केले जाते. त्याप्रमाणे यंदा झालेल्या गणनेत पुढे आलेली आकडेवारी व मागील गणनेत नोंद करण्यात आलेली आकडेवारीत काही बाबतीत साम्य पहायला मिळाले. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असेल काय असा प्रश्न काहिंनी केला आहे. (प्रतिनिधी)
गुहागरात बिबट्यांची संख्या कायम
By admin | Updated: June 18, 2014 00:56 IST