खेड : तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीयरित्या घटू लागली आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला ही घट दिलासादायक ठरणारी आहे. तालुक्यात सध्या २६६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत़
मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गतवर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. गतवर्षी आलेल्या पहिल्या लाटेत जुलै महिन्यात रुग्णांची संख्या तीन आकडी होऊन २८० वर पोहोचली होती. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात दुप्पट झाली होती. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या ३६८ तर सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त ५४७ एवढी नोंदली गेली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णांचा आलेख उतरत गेला. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्या मर्यादित राहिली. मार्च महिन्यापासून लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली होती. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील ग्रामीण भागात सामूहिक संसर्गाच्या घटना घडल्यामुळे तब्बल १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मार्च महिन्यात दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर एप्रिलमध्ये विक्रमी संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये ११९६ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आणि मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्ह परिणाम दिसत आहे. तालुक्यात २४ मेपर्यंत ९२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर सद्यस्थितीत २६६ ॲक्टिव्ह रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. यामध्ये १६० रुग्ण गृह अलगीकरणामध्ये असून, ३६ रुग्ण शिवतेज आरोग्य संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात २८ तर नगरपरिषदेच्या कोविड सेंटरमध्ये १२ रुग्ण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त ३० रुग्ण विविध ठिकाणी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
तारीख ॲक्टिव्ह रुग्ण
२० मे ४४८
२१ मे ३९५
२२ मे ३४२
२३ मे २७४
२४ मे २६६