चिपळूण : गणेशोत्सवापूर्वी वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. शनिवारपासून पुलावरून वाहतूक सुरू झाली असून, आम्ही सर्वांनी जो शब्द दिला होता, त्याची पूर्तता झाली. मात्र, तरीही जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्णत्वाला जात नाही, याचे समाधान नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे सांगितले.
मुंबई - गोवा महामार्गावरील चार वर्षे प्रतीक्षा लागून असलेला वाशिष्ठी पूल शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचा एकेरी मार्ग खुला करण्यात आला. यावेळी खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, येत्या दोन महिन्यात वाशिष्ठी पुलाची दुसरी बाजूही खुली केली जाईल. त्यासाठी तितक्याच वेगाने काम सुरू ठेवण्यात आले आहे. त्या जोडीला चिपळूण शहराच्या दृष्टीने एन्रॉन पूलही तितकाच महत्त्वाचा असल्याने तेही काम पावसाळ्यानंतर तातडीने हाती घेतले जाणार आहे. त्याविषयी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची या समितीने पाहणी केली आहे.
आता मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उर्वरित कामही मार्गी लावणे आवश्यक आहे. जोपर्यंत महामार्गावरील उड्डाणपूल, सर्व्हिस रोड व अन्य कामे मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाधान मिळणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गाठीभेटी घेऊन महामार्गाचा उर्वरित भाग तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेला वाशिष्ठी पूल शनिवारी वाहतुकीसाठी खुला झाल्याचा आनंद आहे. अजून अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे. सर्व्हिस रोड, उड्डाणपूल आणि रस्त्याची दुरुस्ती यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू असून, खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू आहेत.