खेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार हेच आपले संस्कार आहेत. आमच्या पक्षप्रमुखांची बदनामी शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. कोणी अंगावर येणार असेल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. याची प्रचिती नारायण राणे व भाजपवाल्यांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी करून दिली आहे. यापुढे अशी चूक ते पुन्हा कुणीही करणार नाहीत. आमचा नाद करायचा नाही, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.
धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विकासकामांसाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. भूमिपुत्रांवरील अन्याय भास्कर जाधव खपवून घेणार नाही. माझे बांधव प्रदूषणाचा सामना करतात. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या रोजगारांवर त्यांचा प्रथम हक्क आहे. कुणी कायद्याची पोलिसांची भीती दाखवून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार असेल तर गाठ शिवसेनेशी आहे. गनिमी काव्याने त्यांना जशासतशे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसैनिकांनी संघटनात्मक कामावर भर द्यावा. गावागावांत शिवसेना मजूबत उभी करा. धामणदेवी गटावरचा शिवसेनेचा भगवा सतत तेजाने फडकवत ठेवा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आक्रमक भाषण करून शिवसैनिकांमध्ये जोश भरला. माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती मानसी जगदाळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी आवाशी गावचे सरपंच ॲड. राज आंब्रे, पंचायत समिती सदस्य एस. के. आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे, अरुण चव्हाण, सरपंच चंद्रकांत चाळके, सरपंच अंकुश काते यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. शिवसेना धामणदेवीतर्फे दिनेश शिरीषकर, विजय साळुंखे, संदीप आंब्रे, एस. के. आंब्रे यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामपंचायत आवाशी, शिवसेना शाखा आवाशी, युवासेना धामणदेवी विभाग तसेच महिला आघाडीतर्फे आमदार जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती मानसी जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपतालुकाप्रमुख विष्णू आंब्रे, माजी उपसभापती पप्पू आंब्रे, दत्ता गोठल, सुरेश काटकर, जीवन आंब्रे, पिंट्या आंब्रे, हुसेन घाटे, सुरेश काटकर, सुरेश जाधव, वहाब सैन, रहिमान चौगुले, मनोहर कालेकर, सतीश आंब्रे, राजन पाष्टे, विभागातील सरपंच, शाखाप्रमुख, युवासैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपविभागप्रमुख दिनेश शिरीषकर, विजय साळुंखे, एस. के. आंब्रे यांनी बैठकीचे उत्तम नियोजन केले होते. दिनेश शिरीषकर, भागणे यांनी सूत्रसंचालन केले.