गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या गजबजलेल्या बाजारपेठेनजीक असलेल्या बंगल्याचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या सुमारे १९ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे ५ लाख २२ हजार रूपये इतकी होते. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दत्ताराम बाबाजी आंबवकर हे शृंगारतळी बाजारपेठेनजीक वेळम फाटा येथे रहातात. ते तलाठी या पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते कामावर गेले होते तर शिक्षिका असलेली त्यांची पत्नीही शाळेवर गेली होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञाताने तोडल्याचे आढळून आले. कपाटातील सुमारे १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे कळल्यावर आंबवकर कुटुंबियांनी गुहागर पोलीस ठाणे गाठून अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, व्ही. टी. जाधव, आशिष बल्लाळ आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले आहे. गुहागरमधील विश्वास खरे खून प्रकरणानंतर झालेल्या घरफोडीमुळे गुहागर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. (वार्ताहर)
शृंगारतळीत दिवसाढवळ्या घरफोडी
By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST