रत्नागिरी : सर्वशिक्षा अभियानातून वर्ग खोल्या बांधण्यासाठी देण्यात येणारे कोट्यवधी रुपयांचे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वशिक्षा अभियानाच्या अनुदानामध्ये मोठी घट झाली असून, सन २०१४-१५ सालचा २३ कोटी ७४ लाख रुपयांचा वार्षिक आराखडा केंद्र शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाकडे सर्वशिक्षा अभियानाचा ५० कोटी रुपयांपर्यंतचा वार्षिक आराखडा सादर करण्यात येत होता. त्याद्वारे वर्गखोल्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत होते. मात्र, आता हा वार्षिक आराखडा निम्म्यावर आला आहे.सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करण्यात येत होते. या अनुदानातून दरवर्षी सुमारे १०० ते १५० वर्गखोल्यांची कामे घेण्यात येत होती. मात्र, आता या अनुदानातून वर्गखोल्यांची कामे घेणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा सर्वशिक्षा अभियानाचा वार्षिक आराखडा कमी झाला आहे. सर्वशिक्षा अभियानातून चालू आर्थिक वर्षाला २३ कोटी ७४ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये सन २०१३-१४ सालचे उर्वरित ३ कोटी १० लाख २१ हजार रुपयांचे अुनदानही मंजूर करण्यात आले आहे. यापुढे नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी सर्वशिक्षा अभियानातून मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शेकडो शाळांमधील वर्गखोल्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. (शहर वार्ताहर)
नवीन वर्गखोल्या बांधकामाचे अनुदान बंद
By admin | Updated: July 2, 2014 00:08 IST