जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आहे. शासनाने गृहविलगीकरण बंद केले आहे. कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा अखंड राबत आहे. जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. व्यवसाय ठप्प असल्याने व्यावसायिकांची ओरड सुरू आहे. गोरगरिबांना काम नसल्यामुळे उपासमार सोसावी लागत आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. एकूणच विचित्र परिस्थिती निर्माण झाली असताना राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. जनतेला करमणुकीची नाही तर सहानुभूतीची तसेच भावनिक आधाराची गरज आहे. वादविवाद बाजूला ठेवून जर एकमेकांच्या हातात हात घालून कोरोना घालविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयावर असलेला ताण व खासगी रुग्णालयांतून होणारी लूट यामुळे सर्वसामान्यांची फरफट होत आहे. अनेक कुटुंबे कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.
राज्यातील सत्ता व केंद्रातील सत्ता वेगवेगळ्या पक्षाची असली तरी स्थानिक नेतेमंडळींनी आपापल्या परीने जिल्हावासीयांसाठी निधी मिळवून देत विकास साधण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे विकासाच्या गोष्टी बाजूलाच राहिल्या आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करताना, विविध यंत्रणांची पुरती दमछाक झाली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगण्यात येत असून, मुलांना याचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात असल्याने सर्वसामान्य जनता भीतीच्या छायेखाली आहे. निव्वळ आश्वासने देण्यापेक्षा जर प्रत्येकाने ठोस कारवाई केली तर नक्कीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार हाेण्यास वेळ लागणार नाही. अजूनही वेळ गेली नाही. जिल्हावासियांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या गोष्टी बाजूला ठेवून केवळ ‘माणुसकीचा धर्म’ जोपासून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरावर लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र लसीकरणावेळीही ज्येष्ठ नागरिक त्यातही व्याधिग्रस्तांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. म्युकरमायकोसिसनेही जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत राजकीय नेतेमंडळी असो वा पदाधिकाऱ्यांना प्रभावीपणे मदत करण्याची आवश्यकता आहे. जनतेमध्येही विश्वास निर्माण होईल, अशी कार्यपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.