जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे अनेक अंगणवाड्या शाळांच्या एखाद्या वर्गखोलीमध्ये तर काही अंगणवाड्या समाजमंदिर, सार्वजनिक इमारत अशांचा आधार घेत आहेत. या अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे. मात्र, हा निधी देऊन करणार काय, कारण निधी दिला तरी अंगणवाड्यांसाठी इमारती कुठे बांधणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जागा बक्षीसपत्राने एखाद्या जागा मालकाने देणे आवश्यक आहे. मात्र, आज जागा देण्यास कोणीही तयार होत नाहीत. अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जागा द्यावी, असे अनेकदा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून आवाहनही करण्यात आले होते. तरीही कोणीही जागा मालक पुढे येत नाहीत. त्यामुळे अंगणवाड्यांना समाजमंदिरांचाच आधार घ्यावा लागणार असून हे चित्र कधी बदलणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जागेची शोधमोहीम सुरू असतानाच ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रांनाही जागा नसल्याने त्यांचीही अवस्था फार बिकट आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य उपकेंद्रांना जागा मिळावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना कळविले होते. सध्या ज्या तात्पुरत्या जागेत आरोग्य उपकेंद्र सुरू आहे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा न मिळाल्यास ते उपकेंद्र जेथे जागा मिळेल त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ते हलविण्यात येईल, असा पर्यायही आरोग्य विभागाने शोधला. तरीही ग्रामीण भागातील दानशूरांकडून जागा देण्यास पुढाकार घेतला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. त्यामुळे भविष्यात या उपकेंद्रांना जागा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांवर या उपकेंद्रांमध्ये किरकोळ औषधोपचार करण्यात येत असला तरी तो रुग्णांचा जीव वाचविण्यास मोठी मदत होते. आता तर उपकेंद्रांसाठी डाॅक्टरही देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य उपकेंद्रांना डॉक्टर देण्यात येत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. त्यासाठी आरोग्य उपकेंद्रांना चांगल्या प्रकारची इमारत असणे आवश्यक आहे. रुग्णांना गावातच आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी या आरोग्य उपकेंद्रांसाठी जागा देण्यास स्थानिक दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.
रहिम दलाल