दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुरंगी होण्याची शक्यता असून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बसपा व राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेताध्यक्ष किशोर देसाई यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फुटीच्या उबरठ्यावर आहे. तसेच राष्ट्रवादीने संजय कदम यांना उमेदवारी दिल्याने दापोली शहरातून मोठी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत शनिवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेचा विरोधी पक्ष म्हणून समोर येत असतानाच राष्ट्रवादी वाढवण्यासाठी ज्यांनी निष्ठेने काम केले अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या संजय कदम यांना पक्षाने तिकीट दिल्याने राष्ट्रवादीचे किशोर देसाई यांनी थेट पक्षाच्या उमेदवारालाच आव्हान दिले. राष्ट्रवादीची बंडखोरी विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे वैभव खेडेकर, काँग्रेसचे सुजित झिमण, बहुजन समाज पार्टीचे ज्ञानदेव खांबे या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी दापोली शहरात जोरदार एन्ट्री करत दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी रॅली काढली. राष्ट्रवादीचे किशोर देसाई यांनीही रसिकरंजन येथे समर्थकांचा मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने केलल्या अन्यायाविरोधात देसाई यांनी दंड थोपटले आहेत. (प्रतिनिधी)
दापोलीतून राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांचे बंड
By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST