रत्नागिरी : कोणी पक्ष बदलला म्हणून हार मानणारे कार्यकर्ते आपण नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप परिश्रम घेतील. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही रत्नागिरीत सभा घेतील. त्यामुळे कोणाच्या जाण्याने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. येथील मराठा मंडळाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, बाबाजी जाधव, पक्षाच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख स्मितल पावसकर, नगरसेवक सुदेश मयेकर व अन्य नेते उपस्थित होते. ज्यांनी राष्ट्रवादीचा विश्वासघात करून पक्षबदल केला ते आता प्रचार करताना काय सांगणार, असा सवाल करीत कार्यकर्त्यांची ताकद याआधी कुठेतरी वाया गेली, असे समजून ही ताकद आता मुर्तुझा यांच्या मागे उभी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मतदारांना कार्यकर्ते म्हणून आपण विचारा की कोण गद्दार आहे व कोण निष्ठावान आहे, त्यातूनच वस्तुस्थिती मतदारांसमोर जाईल, मुर्तुझ यांचा विजय निश्चित होईल, असे तटकरे यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)आपल्यावरच सारे ओझे?तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच जिल्ह्यात विकासकामांसाठी निधी आला. मात्र, रथातून गणपती बसवून नेताना रथाखाली असलेल्या श्वानाला वाटते की, आपल्यावरच सारे ओझे आहे. पण, ती स्थिती नाही. आता पक्ष बलशाली आहे, याची जाणीव दलबदलुंनी ठेवावी, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खचणारे नाहीत --सुनील तटकरे
By admin | Updated: October 2, 2014 00:21 IST