अशोक पाटील - इस्लामपूर -ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या ताकदीवर इस्लामपूर मतदरसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते बेफाम झाले आहेत. राजकारणाच्या आडाने गुंडगिरी, खासगी सावकारी, वाळू तस्करी, भूखंड घोटाळे यामध्ये ते तरबेज बनल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची प्रतिमा चांगली असतानाही त्यांचा जनमताचा आलेख खालावत असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे वाळवा-शिराळा तालुक्यात ऊस उत्पादकांच्या रूपाने खा. राजू शेट्टींच्या मागे एकवटलेली ताकद विधानसभेला मात्र विभागली आहे. जयंत पाटील यांनी राजकारणात चाणक्य नीतीचा वापर केला आहे. दिलीपतात्या पाटील, माणिकराव पाटील, विनायकराव पाटील, पी. आर. पाटील या निष्ठावंतांसह पूर्वीचे विरोधक विलासराव शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांना राष्ट्रवादीत जखडून ठेवण्यासाठी राज्यपातळीवर आणि राजारामबापू उद्योग समूहात त्यांना मानाचे स्थान दिले. त्यामुळे तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नाराज आहेत. जयंतरावांच्या ताकदीवर मतदरसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते बेफाम झाले आहेत. राजकारणाच्या आडाने गुंडगिरी, खासगी सावकारी, वाळू तस्करी, भूखंड घोटाळे यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे कार्यकर्तेच सांगत आहेत. जयंतरावांची वैयक्तिक पातळीवर ताकद आहे. याचा गैरफायदा कार्यकर्ते उठवत आहेत. कारण स्थानिक पातळीवरील राजकारण करताना या नेत्यांना कार्यकर्त्यांविना काहीही करता येत नाही. जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी कंबर कसली आहे. परंतु महायुतीतच गद्दारांची संख्या वाढू लागली आहे.स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील यांच्यामध्ये मतभेद होते, ते आता चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभेला शेट्टी, तर विधानसभेला जयंत पाटील, हा ऊस उत्पादकांचा नारा याही निवडणुकीत कायम आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन मुंबईची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधकांच्या नाकापर्यंत पाणी आले आहे. जयंतरावांविरोधात शड्डू ठोकण्याचा आव आणला जात आहे. नानासाहेब महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांच्याच पायात पाय घालण्यासाठी विरोधकांत गद्दारीचे पेव फुटले आहे.
राष्ट्रवादी बेफाम, तर महायुती विभागली
By admin | Updated: September 23, 2014 23:59 IST