गुहागर : गुहागर समुद्रकिनारी वनविभागाच्यावतीने पर्यटन निधीतून पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी उभारण्यात आलेले नाना - नानी पार्क तीन वर्षांपासून उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वनविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने विहिरीचे काम रखडले आहे.भास्कर जाधव राज्यमंत्री असताना वनविभाग खाते त्यांच्याकडे होते. गुहागर समुद्रकिनारा पर्यटक तसेच स्थानिकांना वेगळे आकर्षण ठरावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही दररोज निवांत वेळ घालवता यावा, या हेतूने गुहागर पोलीस परेड मैदानाच्या मागे असणाऱ्या सुरुबनामध्ये नाना-नानी पार्क उभारण्यात आले आह. या पार्कचे काम होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी उद्घाटन होऊ शकलेले नाही.जवळपास १० गुंठ्यांहून अधिक क्षेत्रामध्ये असलेल्या पार्कमध्ये बसण्यासाठी चारही बाजूंनी लोखंडी बाजू बसवण्यात आले आहेत, तर सर्व क्षेत्रामध्ये हिरवळीचे अच्छादन (प्लॅन) तयार करण्यात आले आहे. ही हिरवळ वर्षभर कायम ठेवण्यासाठी पावसाळावगळून इतरवेळी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. यासाठी २०११ मध्ये या पार्कमध्ये वन विभागामार्फत विहिरीसाठी आवश्यक कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. त्यासाठी लागणारा शासकीय निधीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आल्याचे वनपाल राजश्री कीर यांनी सांगितले.याबाबत ग्रामीण पुरवठा विभागाचे भोजे यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवण्यात आल्याचे सांगितले. या प्रस्तावामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या. मात्र, याबाबत प्रस्ताव दिल्यानंतर वन विभागामार्फत कोणताही संपर्क न झाल्याने या त्रुटी तशाच राहून प्रस्ताव तसाच राहिला. वनविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हे दोन्हीही शासनाचे विभाग असताना केवळ दोघांमध्ये समन्वय नसल्याने नाना-नानी पार्क पूर्ण होऊनही सर्वांसाठी खुले होऊ शकलेले नाही.सध्या या पार्कमधील हिरवळ कायम ठेवण्याकरिता पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिने खासगी टँकरने पाणी शिंपावे लागत आहे. तसेच या प्रस्तावामधील त्रुटी दूर करुन याचे कंत्राट दिले गेले असल्याने पार्कमध्ये विहिरीचे काम लवकरच सुरु होईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता भोजे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
नाना-नानी पार्क अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: April 16, 2015 00:09 IST