रत्नागिरी : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. तशा सूचना कोकण परिमंडलातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कोकण भौगोलिकदृष्ट्या जंगल, डोंगर, दऱ्या यामध्ये वसलेला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे प्रत्येक वीज वाहिनीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर येणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना सर्व शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साधन सामग्री वायर्स, इन्स्युलेटर, आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबाबत सर्व विभागीय कार्यालयाने वेळीच दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
गतवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात वीज वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले होते; परंतु महावितरण कंपनीने खंबीर पावले उचलून बाधित यंत्रणा रेकॉर्ड ब्रेक कालावधीत पुन्हा उभी केली होती. निसर्ग चक्रीवादळ, फयान वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वीज यंत्रणेला कामाचाही मोठा अनुभव मिळाला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात किरकोळ घटना वगळता वीज पुरवठा सुरू राहील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे.
रत्नागिरी शहराला अखंडित वीजपुरवठा राहावा, यासाठी २२० किलोवॅट वाहिनीचे निवळी ते कुवारबाव दुपदरीकरण करण्याचे काम महापारेषण कंपनी लवकरच पूर्ण करणार आहे. यामुळे शहरासाठी भविष्यात पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीन पर्याय उपलब्ध राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड (मंडणगड), शिवणे (गुहागर), ओणी (राजापूर) आणि साडवली (संगमेश्वर), आदी नव्याने बांधलेली विद्युत उपकेंद्रे आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक दर्जेदार व अखंडित सुरू राहणार आहे.
गावखडी ते पावस अशी स्वतंत्र नवीन पर्यायी वाहिनी कार्यरत झाल्याने त्या परिसरातील पावसाळी वीज पुरवठा अखंडित सुरू राहणार आहे. रत्नागिरी शहरातील भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळी आणि वादळी हवामानातही सातत्यपूर्ण, सुरक्षित वीज पुरवठा सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाहिन्यांवर झुकलेली झाडे, फांद्या यांची वेळीच साफसफाई करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटणे, त्यामुळे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे.
....................
कोकण परिमंडलांतर्गत मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी महावितरण कंपनीची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या कामकाजासाठी काही काळ वीज पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्ती कामासाठी वीज ग्राहकांनीही सहकार्य करावे.
- देवेंद्र सायनेकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल, रत्नागिरी.