चिपळूण : तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. फुरुस येथे डोंगराचा काही भाग खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसीलदार वृषाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ‘माळीण’ प्रकरण अद्याप ताजे असतानाच फुरुस-कदमवाडीजवळ असलेल्या डोंगराचा काही भाग खचल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कदमवाडीपासून १ कि.मी. अंतरावर २००५ मध्ये डोंगर खचला होता. याच डोंगराचा काही भाग आज खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या डोंगरावर पूर्ण जंगल आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच तहसीलदार वृषाली पाटील, मंडल अधिकारी एम. व्ही. मिसाळ, तलाठी डी. एस. सरगर-माने यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली.सध्यातरी घाबरण्यासारखी स्थिती नाही. परंतु, कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तेथे असणाऱ्या १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही घरे नवीन आहेत.रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी घरात न झोपता गावात इतर ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे रहावे, असे सूचविण्यात आले आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, या भागाची भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येईल, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले. सकाळी १० नंतर पावसाची संततधार सुरू झाली. ती दिवसभर सुरूच होती. पावसामुळे दहिवली खुर्द गावी मनोहर सोमा चव्हाण यांचे घर कोसळून २२ हजार ६०० तर अन्नधान्याचे १२०० रुपये असे एकूण ३४ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. याच गावातील बाबल्या बाळ्या नागले याचा गोठा कोसळून १० हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव येथे शंकर भिकाजी शिंदे यांच्या घराचे पत्रे उडून १५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ व महसूल खात्यातर्फे दरडी कोसळणारी ठिकाणे व पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. शासकीय यंत्रणा कोणताही धोका होऊ नये, यासाठी सतर्क आहे. (प्रतिनिधी)--डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या १२ नवीन बांधलेल्या घरांना स्थलांतराच्या नोटीस --भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करणार पाहणी, तहसीलदार वृषाली पाटील यांनी केली पाहणी
फुरुस येथे डोंगर खचला
By admin | Updated: August 5, 2014 00:10 IST