चिपळूण : दुसरीही मुलगी झाली, म्हणून अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून ठार मारल्याप्रकरणी तिच्या आईला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील शिल्पा प्रवीण खापले असे या निर्दयी मातेचे नाव असून, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) हा निकाल दिला.तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथे ५ मार्च २०२१ रोजी राहत्या घरी ही घटना घडली होती. शिल्पा खापले हिला दोन मुली होत्या. पहिल्या मुलीनंतर आपल्याला मुलगा व्हावा, अशी तिची इच्छा होती. मात्र, तिला दुसऱ्यांदा मुलगीच झाली. तिचे नाव शौर्या ठेवण्यात आले. शौर्या अवघ्या एक महिन्याची असताना तिचीच आई शिल्पाने पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिचा जीव घेतला. खाली डोके आणि वर पाय अशा पद्धतीने तिने मुलीला बादलीत बुडवले.याप्रकरणी प्रारंभी सावर्डे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, पोलिसांना चौकशीदरम्यान चिमुकलीचा खूनच झाला आहे, असा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी याप्रकरणी सखोल तपास केला आणि निर्दयी आईवरच खुनाचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी सोमवारी आरोपी शिल्पा खापले या मातेस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी तिच्या पतीसह १५ जणांची साक्ष तपासली. मुलाच्या हव्यासापोटीच तिने अवघ्या एक महिन्याच्या बाळाची हत्या केल्याचे या प्रकरणात सिद्ध झाले.
जग पाहण्याआधीच मृत्यूभारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रवीण बाळाराम खापले यांची ही मुलगी होती. त्यांची मोठी मुलगी पाच वर्षांची आहे. त्यानंतर त्यांच्या घरी शौर्या या चिमुकलीने जन्म घेतला होता. मात्र, उघड्या डोळ्यांनी जग पाहण्याआधीच निर्दयी आईने तिचा जीव घेतला होता.
न्यायालयाने मुलींबाबत सामाजिक दृष्टिकोन विचारात घेऊन एक महिला असूनही मुलाच्या हव्यासापोटी स्वतःच्या पोटच्या मुलीचा खून केल्यामुळे ही शिक्षा सुनावली आहे आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश या खटल्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. - ॲड. अनुपमा ठाकूर, सरकारी वकील, चिपळूण