मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कला, खेळाविषयीच्या ग्रेस गुणांची नोंदणीच राहून गेली तर गैरहजर मुलांच्या नावापुढे गुण दिले गेले. शाळास्तरावर गुणांची नोंद करताना, झालेल्या चुकांमुळे परीक्षार्थींच्या टक्केवारीवर परिणाम झाला. सूज्ञ पालकांनी चूक शाळास्तरावर लक्षात आणून देताच तातडीने दखल घेतली गेली. त्यामुळे विभागीय मंडळ स्तरावर तांत्रिक दुरुस्ती सुरू असून, याबाबत राज्य शिक्षण मंडळांनाही सूचित करण्यात आले आहे.
कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने परीक्षा रद्दचा निर्णय घेत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनामुळे यावर्षी गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती रद्द केल्या आहेत. चुकांमुळे पाल्याचे नुकसान होत असल्याचे पालकांनी शाळांना निदर्शनास आणून दिले. विभागीय मंडळापर्यंत त्याची दखल घेण्यात आली. त्यामुळे सध्या चुकांची दुरुस्ती करून सुधारित गुणपत्रक देण्यात येत आहे. कोकण विभागीय मंडळात हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी असले तरी पालक, विद्यार्थी यांची फरफट मात्र झाली आहे.
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
n शाळा, कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर मूल्यांकन
n मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र/सराव परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना घरी दिल्या होत्या.
n गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन सुविधा यावर्षी दहावी, बारावी परीक्षेसाठी उपलब्ध नाहीत.
गैरहजर विद्यार्थ्यांना दिले गुण, परीक्षार्थी राहिले उपेक्षित
n गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे शाळांनी केली गुणांची नाेंदणी
n परीक्षार्थींचे गुण दुसऱ्याला गेल्याने नाराजी
n चित्रकला, खेळांचे ग्रेस गुणांचीही नोंदणी न केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम
n पालकांनी शाळांकडे तक्रार केल्यानंतर विभागीय मंडळापर्यंत तक्रारीची नोंद, तांत्रिक दुरुस्ती सुरू
पालक/विद्यार्थी म्हणतात.
..
मी तोंडी परीक्षेला हजर होते; मात्र माझी मैत्रीण गैरहजर होती. निकालानंतर माझे गुणच कमी असल्याने बाबांनी शाळा, बोर्डापर्यंत पाठपुरावा केला. गैरहजर असलेल्या मैत्रिणीच्या नावापुढे गुण नोंद केली गेल्याने माझे नुकसान झाले होते.
- कविता मोरे, रत्नागिरी
माझ्या मुलांचे चित्रकलेचे ग्रेस गुण धरले नव्हते. निकाल पत्रकावरून लक्षात येताच शाळांशी संपर्क साधला. शाळांना गुणांची नोंद केली होती. बोर्डाकडूनच गुण ग्राह्य न धरल्याने टक्केवारी घसरली; परंतु सुधारित निकालपत्र देण्यात आले.
- रक्षिता जोशी, रत्नागिरी