राजापूर : राजापूर पंचायत समितीची सभा दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभापती करुणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली किसान भवन सभागृहात आयोजित केली आहे. तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे. शाळा सुरु करावयाचा का, यावर निर्णय घेतला जाणार आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरही यावेळी जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेतीचे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील शिवणे, माभळे, उमरे येथे गव्यांच्या मुक्त संचारामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. भात पीक तयार होत असताना गव्यांकडून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थ प्रशासनाकडे करीत आहेत.
रक्तदान शिबिर
मंडणगड : पालघर वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाकडून दहा हजारांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, ॲड. सचिन बेर्डे, रमेश दळवी उपस्थित होते.
बिबट्याचे दर्शन
राजापूर : शहरातील रुमडेवाडी येथे बिबट्याने घराच्या छतावरून श्वानाला पळविल्याची घटना घडली आहे. रुमडेवाडी येथे बंगल्यात काम करणारे कर्मचारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी उठले असता बिबट्या श्वानाला मारुन नेत असताना दिसला. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
कबड्डीपटू मोरेचा सत्कार
खेड : शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाकडून विजेतेपद पटकविणाऱ्या संघातील घेरापालगड-मोरेवाडी येथील सुयोग मोरे याचा उपसरपंच अमित कदम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संकेत कदम, संतोष मोरे, समीर मोरे, सखाराम मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.