रत्नागिरी : केवळ एका दिवसांत निर्णय घेऊन तीन वर्षांचे आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रणच न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे तीन वर्षे या पुरस्कारांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वंचित होते. हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जात असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या पुरस्काराचे वितरण गेली दोन वर्षे रखडले होते. सन २०१२-१३, २०१३-१४ आणि सन २०१४-१५ या तिन्ही वर्षांचे एकूण २७ आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार बुधवारी वितरण करण्यात आले. या समारंभाला अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व वित्त सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी व अन्य उपस्थित होते. सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला असला तरी याला नाराजीची मोठी किनार होती. जिल्हा परिषदेचा कार्यक्रम म्हटला की, सर्व पदाधिकारी, सदस्यांना हक्काने निमंत्रित करणे आवश्यक होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार १५ दिवसांच्या रजेवर गेल्यावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे हजर झाल्यावर पुरस्कारासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर ताबडतोब बुधवारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अर्ध्या तास आधी काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, बहुतांश सदस्यांना या पुरस्काराचे निमंत्रणही मिळालेले नाही. तीन वर्षांनंतर देण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे आवश्यक होते. मात्र, ग्रामपंचायत विभागाने घाईने हा कार्यक्रम उरकून घेतला. एवढी घाई कशासाठी, कोणासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत विभागाच्या अशा कारभाराबद्दल सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी २० हजार रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, हा कार्यक्रम घाईत असल्याने या कार्यक्रमाचा खर्च ग्रामसेवक संघटनेवर लादण्यात आला होता. त्यामुळे एवढ्या घाईत कार्यक्रम उरकून ग्रामपंचायत विभागाने काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत विभागाने घाई का केली. ग्रामपंचायत विभागाने हा कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून घाईत उरकून घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निमंत्रणाविना आदर्श पुरस्कार सोहळा
By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST