रत्नागिरी : ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि रत्नागिरीतील उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, उद्योजक सौरभ मलुष्टे, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र गावडे उपस्थित होते.सामाजिक कार्याचा वसा घेतलेले सौरभ मलुष्टे यांनी ही संकल्पना व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली़ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व आरोग्य सभापती उदय बने यांनी या संकल्पनेला तत्काळ मंजुरी दिली होती.रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन ही लसीकरण व्हॅन ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कोविडचा सामना खऱ्या अर्थाने करायचा असेल तर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण विनासायास पार पडावे या तळमळीने उद्योजक सौरभ मलुष्टे मागील अनेक दिवसांपासून काम करीत आहेत.
लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मलुष्टे यांनी मोफत रिक्षाचीही व्यवस्था केली होती. ज्येष्ठांना लसीकरण सुविधा विनासायास मिळावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेला. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग ज्येष्ठांसाठी खूप अडचणीचा होता, त्यातूनही या उपक्रमामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे. यामुळेच हा उपक्रम लसीकरण प्रक्रिया वाढीस मदतीचा ठरणार आहे.