चिपळूण : कोकणातील तरुण नोकरीसाठी मुंबई-पुणेसारख्या शहरात जातो, तो इथे राहिला पाहिजे. इथल्या मातीत व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा झाला पाहिजे, यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. त्यासाठी कोकण विभागीय सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये स्थापन करू, तुम्हाला जी मशिनरी, यंत्रणा लागेल, ती आपण देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी चिपळुणात दिली.चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७८व्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार दरेकर बोलत होते. ते म्हणाले की, काेकणातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी इथे ‘पाच मॉडेल प्रक्रिया उद्योग’ उभे राहिले पाहिजेत, तुम्ही पुढाकार घ्या. याकरिता मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करू, असे त्यांनी सांगितले.हा कार्यक्रम शहरातील बहादूरशेख नाका येथील ‘सहकार भवन’ सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सेवानिवृत्त अपर आयुक्त एस. बी. पाटील, जिल्हा विकास अधिकारी अनिल कळंद्रे, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जिजाबा पवार, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, चिपळूण नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक साबळे उपस्थित होते.प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून येत्या पाच ते दहा वर्षामध्ये कोकणात उत्तम पद्धतीचा सहकार उभा राहील, असा शब्द त्यांनी दिला. पतसंस्था चालवत असताना पतसंस्थांचा आपला व्यवसाय वाढवण्यावर भर असतो. मात्र, चिपळूण नागरीने व्यवसाय वाढवताना सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. या पतसंस्थेने कष्टकऱ्याला मदतीचा हात, बेरोजगाराला रोजगार, तर उद्योजक घडवण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले.
प्रवीण दरेकर यांचे गाैरवाेद्गारसुभाषराव चव्हाण यांनी लोकांसाठी काय करता येईल, काय देता येईल, त्यांना प्रशिक्षित कसं करता येईल, राज्य संघाच्या अध्यक्षांना बोलावून माझ्या या कोकणच्या मातीमध्ये आणखी सहकारासाठी काय करता येईल, याचा विचार केला, असे गाैरवाेद्गार दरेकर यांनी काढले.