रहिम दलाल - रत्नागिरी -जिल्हा परिषदेच्या सुमारे ५७६ प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, अपुऱ्या निधीमुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्हा नियोजन मंडळाकडून आलेल्या ६० लाख रुपयांच्या अपुऱ्या निधीतून दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या ३६ शाळांची गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुरुस्ती झालेली नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ८ हजार २०० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये अनेक शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ जिल्ह्यात सुमारे ५७६ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ मात्र, जिल्हा नियोजनकडून मागील आर्थिक वर्षामध्ये केवळ ६० रुपये दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्यातून केवळ ३६ दुरुस्तीसाठी घेण्यात आल्या होत्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी आलेले अनुदान प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या ३६ शाळांचीही दुरुस्ती झालेली नाही. पावसाळा सुरु असल्याने जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांना आता गळती लागली आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेमध्येही जोरदार चर्चा झाली होती. नियोजनकडे शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केलेली असताना केवळ ६० लाख रुपये देऊन पाने पुसण्यात आली. त्यातून केवळ ३६ शाळा दुरुस्त होणार असल्या तरी उर्वरित ५४० शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान कुठून आणणार, असा प्रश्न शिक्षण विभागाला सतावत आहे. तसेच या नादुरुस्त शाळा पडून अनर्थ घडल्यास त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तालुकानादुरुस्त शाळामंडणगड१दापोली२खेड१चिपळूण५गुहागर१संगमेश्वर ९रत्नागिरी१६लांजा१एकूण३६
दुरुस्तीत शाळा नापास!
By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST