रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कायम राहावी, याकरिता त्यांच्या पालकांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात आला आहे. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे १३ हजार पालकांना बसला आहे. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, पारशी आणि शीख समाजाचा समावेश आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. अल्पसंख्याक लोकसमुहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सन २००८-०९ या वर्षापासून ही योजना लागू करण्यात आली होती. किमान ७५ टक्के उपस्थिती असणार्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसह खासगी अनुदानित शाळांना ही योजना लागू होती. प्रतिदिन २ रुपये याप्रमाणे ९६ दिवसांचा उपस्थिती भत्ता विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येत होता. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १३ हजार ५९४ विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळत होता. त्यांची तालुकानिहाय संख्या आकडेवारी : मंडणगड ८८८, दापोली १६३४, खेड १४९५, चिपळूण २२२८, गुहागर ७७४, संगमेश्वर १५९६, रत्नागिरी २८४४, लांजा १०४५ व राजापूर १०९०. या अनुदानापोटी शासनाने गेल्यावर्षी २६ लाख १० हजार ४८ रुपये वाटप केले होते. मागील पाच वर्षांतील अंमलबजावणीचा आढावा घेतला असता या योजनेची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आले. या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक असल्याचा ठपका ठेऊन शासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १३५00 विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फटका बसला आहे. अल्पसंख्यांक समाजातीलविद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी असा शासनाचा हेतू आहे. त्या हेतूची व योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते याबाबत पालकांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. सध्या जिल्ह्यात या योजनेबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात मात्र तितके यश आलेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून पुढील शैक्षणिक वर्षात या विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. (शहर वार्ताहर)
अल्पसंख्य विद्यार्थी भत्त्याला मुकले!
By admin | Updated: May 12, 2014 00:18 IST