रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील प्रलंबित असणारी कामे मार्गी लावण्यात यावीत, अशी मागणी संगमेश्वर तालुका विकास परिषदेतर्फे शासनाच्या संबंधित मंत्रालयाकडे करण्यात आली असून, प्रलंबित कामाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार विकास परिषदेच्या झालेल्या सभेत व्यक्त करण्यात आला.राजीवली (ता. संगमेश्वर) येथे गडनदी व पाटबंधारे खात्याकडून धरण बांधण्याचे काम गेल्या तीस वर्षांपासून सुरु आहे. या धरणावरील लाभ क्षेत्रातील चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील भागासाठी उजवा व डावा कालवा काढण्याची तरतूद आहे. उजव्या कालव्याचे काहीअंशी काम झाले आहे. डाव्या कालव्याचे काम झालेले नाही. असे असताना जलदान समारंभ उरकण्यात आला. वीज निर्मितीचा पत्ता नाही. धरणाच्या भिंतीमध्ये लाकडाचे मोठमोठे ओंडके टाकण्यात आल्याने धरणाच्या भिंतीतून पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे. त्याच्यावर पांघरुण घालण्यासाठी धरणाच्या बांधकामाचा बहाणा करुन दरवर्षी उन्हाळ्यात धरण रिकामे केले जात आहे. गडनदीवरील धरणाच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती संगमेश्वर तालुका विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक डॉ. एम. डी. शेकासन व रघुनाथ सुर्वे यांनी दिली. (प्रतिनिधी)
प्रलंबित प्रश्नांकरिता मंत्रालयाकडे धाव
By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST