शेखर धोंगडे -चिपळूण चिपळूण शहरातील दोन भव्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन रविवारी मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीत करण्यात आले. शहर विकासात भर टाकणारा पेठमाप ते गोवळकोटला जोडणाऱ्या बाजारपुलाचे भूमिपूजन व अण्णासाहेब कर्वे भाजीमंडईचे उदघाटन यावेळी करण्यात आले. योगायोगाने शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना बाजारपुलाच्या भूमिपूजनाची संधी मिळाली. या उद्घाटन व भूमिपूजनाला जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, नगरविकास मंत्री उदय सामंत यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे, अनिल तटकरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. उपस्थित राहणार होते. परंतु, मुंबईत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी तातडीची बैठक लावल्याने हे बडे नेते उपस्थित राहू शकले नाहीत. सुनील तटकरे येतील अशी अनेकांना अपेक्षा होती. नेत्यांना एकत्रित पहाता येईल म्हणून कार्यकर्ते खूश होते. पण यातील काहीच घडले नाही. चिपळूणमध्ये विकासाच्या दृष्टीने भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असला तरी यामुळे गोवळकोट, पेठमाप व चिपळूणवासियांची अनेक मनं जोडली जाणार आहेत हे निश्चितच. अनेकांनी आपल्या भाषणामध्ये चिपळूणच्या विकासाबाबत कौतुकही केले.पण कौतुक करता करता काहींनी अप्रत्यक्ष भविष्यात घडणाऱ्या राजकारणाची चाहूलही दाखवून दिली. तर काहींनी आतापर्यंतच्या विकास कामाला शिवेसना भाजपचेही सहकार्य कसे मिळाले हेही दाखवून दिले. विकासाचे एक पाऊल उचलले गेले असले तरी यामध्ये श्रेय अनेकांचे हे दाखवून देण्याचा प्रयत्नही येथे एकमेकांनी कळतनकळत केला. या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे सदानंद चव्हाण हे उपस्थित राहिले. घरच्या कार्यक्रमातच यांना मान्यवर नेते नसतानाही एक चांगली संधी मिळाली. परंतु, याच कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, उद्योग व अवजड मंत्री अनंत गीते यांनाही निमंत्रित करायला हवे होते अशी कुजबूज शिवसेना भाजपच्या कार्यकर्ते व नगरसेवकांमध्ये होती. त्यांना न बोलविल्याविषयीची खंतही यांच्या मनात होती. परंतु, चिपळूणचा विकास होत असल्याने या विषयीची प्रतिक्रिया देणे अनेकांनी टाळण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनीदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनंत गीते खासदार असताना भाजी मंडईच्या कामासाठी कशी मदत केली हे सांगितले. आमदार सदानंद चव्हाण यांनीही विकासाच्या मुद्याबरोबरच चिपळूणला भविष्यात निश्चितच मदत करु. आपले मित्र माजी आमदार रमेश कदम यांचे स्वप्नातले चिपळूण पूर्ण करायला सहकार्य करु. याचबरोबर बाजारपुलाचे आता भूमिपूजन झाले असले तरी पुढील काळात याचे उद्घाटनही आपणच करू असे त्यांनी सांगितले.
बाजारपूल झाला, मंडई झाली! आता पुढे काय..
By admin | Updated: June 17, 2014 01:16 IST