रत्नागिरी/चिपळूण : मतमोजणी होऊन निकाल जाहीर होताच, सर्वसामान्य लोक बाजाराकडे वळले असून, जिकडे-तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. बराच काळ थंड असलेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीमुळे उजळल्या असून, खरेदीला वेग आला आहे. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी तसेच चिपळूण शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेले चार ते पाच दिवस ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. बाजारात रंगीबेरंगी आकाश कंदील, विविध प्रकारच्या शोभिवंत पणत्या, मावळे, रंगीबेरंगी रांगोळ्या व रांगोळ्ीच्या नक्षीचे छाप, सुका मेवा, फळे, तसेच तयार फराळ, फटाक्यांचे स्टॉल रस्त्यावरती लावण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरातील रामआळी, गोखलेनाका मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही रस्त्यावर दुकाने मांडली होती. परिणामी ग्राहक खरेदीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसत होते. वाढत्या महागाईचा फटका खरेदीला बसत आहे. प्रतिवर्षापेक्षा यावर्षी ग्राहकांची संख्या कमी असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दरही गगनाला भिडल्याने घरगुती फराळ करण्यापेक्षा विकत फराळ घेण्याकडे कल वाढला आहे. गरजेपुरता तयार फराळ घेवून दिवाळी साजरी केली जात आहे. बाजारपेठेत सध्या फटाक्यांचे विविध ठिकाणी स्टॉल लागले आहेत. आपला नेहमीचा व्यवसाय बाजूला ठेवून व्यापारी फटाक्यांचे स्टॉल समोर मांडून आहेत. तेथे खरेदीसाठी लहान मुले व त्यांच्या पालकांची गर्दी दिसते. धनत्रयोदशीचे औचित्य साधून कापड दुकानात कपड्यांची खरेदी सुरू होती. उद्या बुधवारी पहाटे अभ्यंगस्नान असल्याने बाजारात फुले, ‘कारटी’ यांची खरेदी सुरू होती. पर्यावरणस्नेही कंदील, मातीच्या पणत्या तसेच फॅन्सी पणत्या यांची खरेदी सुरू होती. लक्ष्मीपूजन गुरूवारी असले तरी बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. १०० रूपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू होती. पिवळ्या व केशरी झेंडूना विशेष मागणी दिसून येत होती. रत्नागिरीत आविष्कार संस्थेतील मतिमंद विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंनाही चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)दिवाळी सणानिमित्त रामआळी वाहतुकीस बंदरत्नागिरीतील रामआळी ही मोठी बाजारपेठ समजली जाते. दिवाळीसाठी वाढणारी ग्राहकांची गर्दी ध्यानी घेऊन रामआळी हा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आणखीन दोन दिवस गर्दीचा ओघ कायम राहणार असल्याने हा मार्ग यापुढेही बंद ठेवण्यात येणार आहे.रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत पणत्या, रांगोळ्यांना दिवाळीनिमित्त मागणी वाढली आहे. दीपावली हा दिव्यांचा सण मानला जातो. त्यामुळे दीपावलीच्या पाचही दिवसात अख्खं घर उजळून निघतं. त्यासाठी आता मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. पणत्याबरोबरच रांगोळ्या आणि झेंडूंच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. महिलावर्गाचीही खरेदीसाठी मोठी गर्दी आहे.
गर्दीमुळे बाजार उजळला!
By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST