रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारपट्टीची जबाबदारी असणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांवर गेले चार महिने विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या ६० सुरक्षा रक्षक कार्यरत असून, त्यांना चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक काेंडी हाेत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांचा समावेश आहे, तर ४३ मासळी उतरण्याची केंद्र आहेत. या किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षक गेले चार महिने मानधनाशिवाय काम करत आहेत. याबाबतीत वेळोवेळी मागणी करूनही शासन स्तरावर अद्यापही यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. सुरक्षारक्षकांचे मानधन नेहमीच उशिराने होत आहे. कधी चार महिने तर कधी सहा महिने अशा कालावधीमध्ये सुरक्षारक्षकांचे मानधन जमा होत असल्याने आर्थिक गणित बिघडत आहेत.
जिल्ह्यातील किनारपट्टीवर होत असलेली अवैध मासेमारी, परराज्यातील नौकांचे अतिक्रमण, पर्ससीन मासेमारी यासारख्या गोष्टीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरक्षारक्षकांना करावे लागते. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तसेच कोणत्याही पायाभूत सुविधा नसतानाही सुरक्षारक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत.आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग व बंदरे ही महत्त्वाची स्थानिक प्रश्नांच्या निगडित असलेले खाते आहे. त्यामुळे नवे मत्स्योद्योगमंत्री सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वास सुरक्षारक्षकांनी केला आहे. तसेच नवे मत्स्य आयुक्त प्रदीप पी यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे काम केल्यामुळे नव्या आयुक्तांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे नवीन मत्स्योद्योगमंत्री व नव्या मत्स्योद्योग आयुक्तांमुळे तरी सुरक्षारक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नियुक्तीपासूनच सुरक्षा रक्षक दुर्लक्षितसागरी सुरक्षा रक्षकांची कामगार कार्यालयाकडून निवड करण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये मैदानी परीक्षा झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. या भरतीपासूनच सुरक्षा रक्षकांना वेळेत मानधन मिळत नसल्याची बाब समाेर आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ६० तर काेकण किनारपट्टीवर ३०० सागरी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.