अवीट गोडी व मधुर स्वादामुळे परदेशातील नागरिकांनाही भुरळ घातलेल्या ‘हापूस’चे उत्पादन हवामानातील बदलामुळे दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे मोहोर प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अवेळचा पाऊस, थंडीचे घटलेले प्रमाण, शिवाय वाढलेला उष्मा यामुळे आंबा उत्पादन जेमतेम पंधरा ते वीस टक्केच राहिले. कोरोनामुळे आंबा विक्रीवर परिणाम झाला असतानाच नुकत्याच झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यापूर्वीच जमीनदोस्त झाला. आधीच आंबा कमी, त्यातच वादळामुळे तयार पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.
हवामानातील बदलामुळे दिवसेंदिवस आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. यावर्षी पाऊस लांबला. पाऊस लांबल्याने यावर्षी ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. ऑक्टोबर हीटमुळे झाडांच्या मुळांवर ताण येऊन नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्यावर मोहोर प्रक्रिया सुरू होते. आंबा उत्पादन हंगामापेक्षा लवकर घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करून वापरलेल्या ‘संजीवकांचा’ उपयोगही यावर्षी झाला नाही.
दीपावलीपर्यंत अधूनमधून पाऊसच सुरू होता. थंडीसाठी जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. एकूणच थंडीचे घटलेले प्रमाण, तसेच अवेळचा पाऊस यातून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविला. जेमतेम १५ ते २० टक्केच आंबा उत्पादन राहिले, पहिल्या दोन टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला. सुरुवातीला दर चांगला लाभला; परंतु कोरोनामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने ग्राहक फिरकेनासे झाल्यानंतर दरावर परिणाम झाला.
दरवर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात येत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी आखाती प्रदेश, लंडनमध्ये आंब्याला चांगली मागणी होती, त्यामुळे दर टिकून होते. कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाल्याने वाशी मार्केटमधील दर गडगडले. एकूणच खत व्यवस्थापनापासून बाजारात विक्रीसाठी आंबा येईपर्यंत येणारा खर्च सुद्धा वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत.
स्थानिक विक्री
उत्पादन कमी असताना दर काही दिवस टिकले होते. महागाईमुळे आंबा उत्पादन खर्चात वाढ झाली; परंतु दर गडगडल्याने उत्पादन खर्च वसूल होणे अवघड झाले आहे. खासगी विक्रेते जाग्यावर चांगला दर देत असल्याने त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला. या प्रकारच्या विक्रीमुळे हमाली, वाहतूक खर्च वाचत असल्याने स्थानिक विक्री परवडत असल्याने बागायतदारांचा त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला.
परराज्यातील आंबा विक्रीला
कोकणातील हापूस आंबा विक्रीला येत असतानाच परराज्यातून आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत होता. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश येथून केसर, बदामी, लालबाग, तोतापुरी, कर्नाटक हापूसची आवक सुरू होती. केसर सध्या १०० ते १२० रुपये किलो, बदामी ५० ते ६० रुपये किलो, लालबाग ६० ते ७० रुपये किलो, तोतापुरी ३० ते ५० रुपये किलो, कर्नाटक हापूस १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री सुरू होती. कोकणच्या हापूसचे दर व कर्नाटकच्या हापूस दरात फरक असल्याने विक्रेते एकाचवेळी कोकणचा व कर्नाटकचा हापूस खरेदी करून पिकवून एकत्र करून कोकणचा हापूस नावाखाली मुंबई उपनगरात विक्री करीत असत. यामुळे विक्रेते मालामाल झाले; परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
चक्रीवादळामुळे फटका
पहिल्या दोन टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीसाठी पाठविला गेला; मात्र शेवटच्या मोहोराचा आंबा तयार नसल्यामुळे झाडावर होता. कोवळा आंबा मे महिन्याच्या शेवटी तयार होणार असल्याने शेतकऱ्यांनी काढण्याची घाई केली नव्हती. वादळामुळे सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी यामुळे आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली. वाऱ्यामुळे झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडल्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, त्यामुळे शेतकऱ्यांची वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. सध्या कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे.
नुकसान भरपाईचा लाभ मिळणार का?
फळपीक विमा योजनेंतर्गत अवेळचा पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांक तापमानामुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येते. विमा कंपन्यांनीही झाडावरील पिकाचे झालेले नुकसान याची नोंद घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक विमा कंपन्यांकडून चुकीचे निकष लावण्यात येत असल्याने कित्येक शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतलेला नाही. अवेळच्या पावसासाठी विमा कंपन्यांच्या निकषामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या रकमेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कोट
नैसर्गिक बदलामुळे यावर्षी आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच शेवटचा आंबाही वादळामुळे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड वित्तहानी झाली आहे. सध्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. एकूणच आंबा कमी असतानाच शेवटचा आंबा जमिनीवर आला. आंबा उत्पादकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी.