रत्नागिरी : शहरानजीकच्या उद्यमनगर येथील फिनोलेक्स कॉलनी आवारातील कलमांच्या बागेला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. बघताबघता या आगीने रौद्र रुप धारण केले. मात्र, अग्नीशमन बंब वेळेवर आल्याने ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले. या आगीत ठिबक सिंचनच्या पाईपचे नुकसान झाले आहे. उद्यमनगरनजीकच्या फिनोलेक्स कॉलनी आवारात असलेल्या कलम बागेला अचानक आग लागली. या बागेतील गवताने भरभर पेट घेतल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे बागेतील कलमे यात होरपळली गेली. मात्र, येथील कर्मचाऱ्यांनी ही घटना पाहताच कंपनीच्या अग्नीशमन दलाकडे संपर्क केला. दुपारची वेळ असल्याने व त्यातच गवत सुके असल्याने आगीने बागेतील सर्व जागा व्यापली. मात्र, अग्नीशमन बंब येईपर्यंत या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या फांदीने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काहीवेळातच नगर परिषदेचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. या पथकातील चालक संदीप शिवलकर, फायरमन सुधाकर कांबळे, संतोष गजने यांनी अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कंपनीचाही बंब घटनास्थळी दाखल झाला व नुकसानग्रस्त कलमांवर तातडीने पाण्याची फवारणी करण्यात आली. या आगीमुळे कंपनीच्या ठिबक सिंचन यंत्रणेला व पाईपना हानी पोहचली असून, बागेतील कलमेही होरपळली आहेत. (प्रतिनिधी)
आंबा कलमांची बाग आगीत खाक
By admin | Updated: November 7, 2015 22:38 IST