मंडणगड : काेराेना संसर्ग पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिछाडीवर असलेल्या मंडणगड तालुक्यात कोविड लसीकरणाची धुरा शासकीय रुग्णालयावरच अवलंबून आहे. जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत असताना, तालुक्यात मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाने कोविड लस उपलब्ध करून दिल्यानंतर तालुक्यात लस घेणाऱ्यांचे प्रमाणही मर्यादित आहे. तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व १ ग्रामीण रुग्णालय यामध्ये कोविड लस देण्यात येत आहे, तर एकाही खासगी रुग्णालयात ही लस देण्यात येत नाही.
आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लस देण्यात येते. मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आजवर ६४८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर २९८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात ११८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ जणांना पहिला, तर १ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपर्यंत कुणालाही डोस देण्यात आलेला नाही.
विशेष म्हणजे तालुक्यात देण्यात आलेल्या एकूण डोसमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे. सर्वसामान्य जनतेची टक्केवारी अत्यंत अल्प आहे. आरोग्य यंत्रणा घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन करत असली, तरी जनतेमधून अत्यल्प प्रदिसाद मिळत आहे. तालुक्यात मार्च, २०२० ते २१ मार्च, २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत १६४ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत, तर कोविडच्या दुसऱ्या फेरीत केवळ ११ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत.