राजापूर : लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नाेंदणी करणे बंधनकारक केल्याने ग्रामीण भागातील जनतेला लसीपासून वंचित रहावे लागत आहे़. त्यामुळे लस उपलब्ध हाेऊनही नागरिकांना लस मिळत नाही़. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना लस मिळण्यासाठी प्राथमिक केंद्रनिहाय नियाेजन करावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे़
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविन-१९ मध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लसीकरण कार्यवाही सुरू आहे. परंतु नेटवर्क समस्या असल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाेंदणी करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत़. तसेच लस घेण्यासाठी सामान्य जनता मोठ्या प्रमाणात तयार आहे़. जिल्ह्यात ज्या केंद्रावर लस उपलब्ध असेल त्याठिकाणी कुठल्याही तालुक्यातील व्यक्ती नोंदणी करत असून, उपलब्ध असलेल्या केंद्रामधील स्थानिक जनतेला त्याचा लाभ घेता येत नाही़
तसेच ग्रामीण भागातील जनतेची नाेंदणी झाली तर काही गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र २० किलाेमीटर अंतरावर असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असे आमदार राजन साळवी यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच लसीकरणाच्या उपलब्धतेनुसार ऑफलाईन पध्दतीने ग्रामीण भागामध्ये प्राथमिक केंद्रानिहाय नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायत किंवा उपकेंद्राद्वारे लस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.