हाच भाव, त्याचा ठाव आणि त्या आद्यदैवत श्री गणेशाच्या ईश्वरीय संकल्पनेतील अद्भूत शक्ती, सामर्थ्य समर्थ रामदासांनी हेरलं, अनुभवलं. सर्वांच्या समोर मांडली, लिहिते झाले - ‘सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना...!’ म्हणजेच भावार्थ प्रत्येकाने अनुभवावा. मात्र, सदन म्हणजे घर. घर ही सुखाची, निवाऱ्याची, शाश्वत आधाराची, प्रेमाची, एकत्रित आनंदाने राहण्याची जगभर राबत असलेली सकारात्मक, होकारात्मक, अस्तित्वात्मक आणि एकमेकांच्या सहाय्याने सुरक्षितात्मक ऊब घेण्याचं एक घट्ट वीण असलेली प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. या सदनात श्री गणेशाचे आगमन, त्याचसोबत गौरीचे पाहुणेपण, ज्येष्ठा आणि कविष्ठाचे समृद्धी, शांती आणि आनंदाचे भरलेपण, हे सर्व वर्षभर नव्हे, तर जन्मभर पुरावी, अशी वरदानाची ग्वाही देते. हाच ऐक्याचा प्रेमळ धागा रामदासांनी हेरला. तो या भूमीत पेरला. संस्कृतीची उदात्त भावना बहरली. श्री गणेशाच्या या आगमन आणि स्थापना यातला हा गाभा.
या गणेशाच्या उत्सव काळात अमाप उत्साह असतो, आनंद असतो. घरातलं घरपण बहरण्याचा हा काळ असतो. सामूहिक सात्विक आनंदाच्या भरतीचा ‘ठेवा’, निर्मितीच्या ‘मेव्याला’ खतपाणी घालतो. या काळात म्हणूनच आजारपणाची लेव्हल किंवा ग्राफ खूप खाली आलेला असतो. हेल्दी, आरोग्यदायिनी हार्मोन्स, ॲन्डॉरफीन गटातील सक्रिय होतात. घर, दार, समाज आणि देश फक्त श्री गणेशाच्या आकंठ भक्तीत ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ची प्रत्यक्ष अनुभूती घेत असतो. अशावेळेस आजारपणाला दार किलकिले करुन शरिरात शिरण्याचे धाडसच होत नाही. बघा, अनुभव घ्या. मी वर्षानुवर्षे बघत आलोय, अनुभवत आलोय, किंबहुना सर्व डॉक्टर्स यांच्याकडचेही स्टॅटिस्टिक्स बघा, या काळात आजारपणाची पातळी खूप कमी असते. श्री गणेशाच्या उत्सवाचा हा महिमा आहे.
या श्री गणेशाला सक्तीची ‘वसुली’ मान्य नाही. मात्र, प्रेमाने आणि भक्तीने दिलेली कुठलीही आर्थिक ‘कबुली’ त्याला पावते. म्हणूनच अनेक कठीण प्रसंगी, गरजेच्या प्रसंगी आणि संस्थांना मदतीच्या प्रसंगी या गणेशोत्सवाच्या मंडळांनी श्री गणेशाच्या कृपाशिर्वादाने, त्यातून निर्माण झालेल्या समन्वयाने, आनंदाच्या अत्युच्च क्षणी आणि एकात्म मनाने उदार देणग्या देतात. गरजूंना मदत केली जाते. यातील उदात्त भावना हा श्री गणेशोत्सव त्याला खतपाणी घालतो. यात आरोग्यदायी आनंदाच्या, सर्वात्मक सुंदराच्या अनुभूती आहेत.
टाळ, मृदुंग, ढोलकीच्या तालावर भजन रंगतं. सर्वजण देहभान विसरतात. निव्वळ सात्विक भाव, आत्मिक भाव, संगीताचं अध्यात्मिक रुप, त्याचं गायन, त्याचं मनन, त्याचं चिंतन यात एक आणि अनेक आरोग्याची बीजं आहेत. ते वर्षभर चैतन्य, जागृत ठेवतात. स्ट्रेस किंवा ताण याची पातळी शून्यावर आलेली असते.
डॉ. डीन ऑर्निश, यु. एस. ए.चा एक तज्ज्ञ, प्रिव्हेन्टीव्ह मेडिसिनचा एक संस्थापक जनक. त्याचं संशोधन आहे, Love More (सर्वांवर प्रेम करा), Stress Less (ताण कमी घ्या - म्हणजेच आनंद साजरा करा), Eat Well (उत्तम खाणं खा) आणि Move More (म्हणजेच खूप हालचाली करा)’ या गणेश काळात ह्या सर्व गोष्टी घडतात.
मात्र, या उत्सवाला जी उत्साहाची सात्विक ‘धुंदी’ आहे त्याला उन्मादाची ‘गंदगी’ लागू नये, ही सामूहिक जबाबदारी आहे. यातही सामूहिक आरोग्याचं एक उत्तम लक्षण आहे. निर्मिती आणि विधायकतेचं एक आरोग्यमय प्रतीक आहे. जगात चांगल्या मनाची माणसेच जास्त आहेत. ते ह्या गोष्टी जपतात. श्री गणेशोत्सव घरात आणि समाजात त्याच प्रेरणेची देवता आहे. ती प्रगल्भ आरोग्याची, बुद्धीची, सुंदरतेची, एकात्म निष्ठेची, निर्मितीची, सहजीवनाची, सात्विकतेची, आनंद देण्या-घेण्याची, उदात्त विचारांची, स्वच्छतेची हमी जपण्याची आरोग्यमयी आणि ज्ञानमयी देवता आहे.
श्री गणेश ही संयम आणि शिस्तीचे दैवत आहे. आपणही कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘निर्मूलन आणि प्रतिबंधक शिस्त पाळूया’ आणि म्हणूनच म्हणूया, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!’
(आपले काम - आपली स्थिती भाग ४ पुढील लेखात)