रत्नागिरी : जिल्ह्यात ३१६ मुले कुपोषणग्रस्त असून, त्यांच्यावर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत उपाय सुरु आहेत. वजन वाढवून त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी धडपड सुरु आहे. आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित होतात. जन्मत: कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्युमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडिनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील मुले कुपोषित असली तरी हे प्रमाण अल्प आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ७२ सॅम (अति कुपोषित) आणि २४४ मॅम (मध्यम कुपोषित) बालकांचा समावेश आहे. ज्या अंगणवाड्यांमध्ये ही कुपोषित बालके आहेत, त्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी त्या बालकांची तपासणी करतात. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत अंगणवाडी स्तरावरील ग्राम बालविकास केंद्रांमध्ये कुपोषित बालकांच्या आरोग्याची ३० दिवस विशेष काळजी घेण्यात येते. या कालावधीत कुपोषित बालकांचे दर आठवड्याला वजन घेण्यात येते. (शहर वार्ताहर)
उद्याच्या भविष्याला कुपोषणाची बाधा
By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST