चिपळूण : शहरात नगरपालिकेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत कोविड केअर सेंटरबाबत चर्चा होऊन गटनेत्यांनी काही सूचना करीत कोविड केअर सेंटरला संमत्ती दर्शविली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, सोमवारी याबाबत विशेष सभा होऊन शिक्कामोर्तब होणार आहे.
चिपळूण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहर आणि ग्रामीण भागात दररोज दुपटीने रुग्ण सापडत आहेत. साहजिकच चिपळूणमधील शासकीय आणि खासगी कोविड हॉस्पिटल फुल झाले असून, आरोग्य यंत्रणादेखील मेटाकुटीस आली आहे. अशा परिस्थितीत संभाव्य धोका ओळखून शहरात नगर परिषद कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत होती. नगराध्यक्ष खेराडे यांनी या विषयाची दखल घेत हालचाल सुरू करून शहरातील डॉक्टर, तसेच तज्ज्ञ मंडळींशी चर्चा सुरू केली होती, तर माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांनी उच्च तंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे ही मागणी केली होती.
चारही बाजूने दबाव वाढल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या. मुख्याधिकारी डॉ. विधाते यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन विशेष सभेची मागणी केली आणि हालचालींना वेग आला. नगराध्यक्षा खेराडे यांनी तत्काळ सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक शुक्रवारी बोलावली. या बैठकीला काँग्रेसचे गटनेते उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, राष्ट्रवादीचे गट नेते बिलाल पालकर, शिवसेना गट नेते उमेश सकपाळ आणि भाजपकडून गट नेते, नगराध्यक्षा म्हणून खेराडे उपस्थित होत्या, तर प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते उपस्थित होते.
खेराडे यांनी शहरात कोविड केअर सेंटरची अत्यावश्यक गरज, तसेच भविष्यासाठी आतापासूनच उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती बैठकीत दिली. तसेच त्यांनी कोविड सेंटरसाठी केलेले प्रयत्न बैठका, चर्चा याची माहितीही गटनेत्यांना दिली. बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. गटनेत्यांनी अनेक सूचनाही यावेळी केल्या. कोविड सेंटरसाठी जागा, पाणी, लाईट व्यवस्था, कर्मचारी, डॉक्टर, रुग्णांचे जेवण या सर्व बाबींवर चर्चा केल्यानंतर सर्व गटनेत्यांनी शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी संमत्ती दर्शविली.