आवाशी : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने रविवार, २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील चकदेव मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता शिवाजी महाराज चौकात वाहनांची रॅली निघणार आहे. वेरळ फाटा, खोपी, रघुवीरमार्गे चकदेव मंदिरात ही रॅली पोहोचणार आहे. सहभागासाठी हृषीकेश कानडे, सिद्धेश पाटणे यांच्याशी संपर्क साधावा.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चिपळूण : तालुक्यातील वालोपे ग्रामपंचायतमधून झोलाई सभागृहात कोकण रेल्वे कर्मचारी वालोपे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच रवींद्र आयरे, उपसरपंच सुनील मोहिते, माजी सरपंच नेहा तांबीटकर आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी ६५ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
दापोलीत हातमाग प्रदर्शन
दापोली : शहरामध्ये राधाकृष्ण मंदिर येथे गौरी-गणपतीच्या सणानिमित्त हातमाग व यंत्रमाग कापडाचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. सोलापुरातील हातमाग, यंत्रमागावरील कॉटन ड्रेस, मदुराई कॉटन साड्या, सोलापुरी चादर, बेडशिट, नॅपकिन, सतरंजी, पंचा आदी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
अपघाताची शक्यता
राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन केळवली भुईबावडा या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु या मार्गावर अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर झाडे वाढली आहेत. त्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. सध्या या मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला असल्याने झाडी तोडावी तसेच खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
पूरग्रस्तांना मदत
सावर्डे : चिपळूण शहरातील महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना मुंबई - दादर येथील श्री उद्यान गणेशमंदिर, शिवाजी पार्क आणि सीए दिलीप मेघश्याम आणि वैशाली ग्रुपतर्फे मदत देण्यात आली. १४ व्यक्तींना आर्थिक मदत तर १५२ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू आणि कपडे आदींची मदत करण्यात आली.