खेड : गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या जाहीर करून सुखद धक्का दिलेला असतानाच आणखी एक साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट स्पेशल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट स्पेशल २ सप्टेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
पूर्णपणे आरक्षित असणारी २२ डब्यांची ही स्पेशल गाडी पुढील निर्णय होईपर्यंत धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर गुरुवारी रात्री १२.५० मिनिटांनी सुटून सकाळी १२.२० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरुवारी दुपारी १ वाजता करमाळी येथून सुटून त्याचदिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.