रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक येत्या १९ डिसेंबरला होत आहे. सेनेच्या १४ पैकी एक नगरसेविका राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेना व विरोधकांचे संख्याबळ १३ असे समसमान होऊन विषय समिती निवडणुकीला राजकीय कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास सोडत (लॉटरी) पध्दतीने सभापती निवड करावी लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेत सेनेचे १४ तर अन्य पक्षांचे १३ नगरसेवक असे सध्याचे राजकीय बलाबल आहे. मात्र, सेनेच्या नगरसेविका उज्वला शेट्ये या राजीनामा देणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत. तसे झाल्यास सेना व विरोधकांचे बलाबल प्रत्येकी १३ होईल. त्यामुळे विषय समिती निवडणूक ही चिठ्ठया टाकून घ्यावी लागेल. ही लॉटरी नक्की कोणाला लागेल हे नशिबावरच अवलंबून राहिल. मात्र, शिवसेनेला सर्व सभापतीपदे मिळण्याऐवजी काही सभापतीपदे ही विरोधकांकडे जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेत एकूण २८ नगरसेवकपदे आहेत. त्यातील एका रिक्त जागेसाठी १० जानेवारी २०१६ रोजी पोटनिवडणूक होणार आहे. सध्या २७ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ शिवसेनेचे आहेत तर उर्वरित १३ नगरसेवकांमध्ये भाजप ८, राष्ट्रवादी ४ व कॉँग्रेस १ असे संख्याबळ आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व कॉँगे्रस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. १ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रभाग २ व ४ मधील प्रत्येकी दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. राष्ट्रवादीतूून बाहेर पडत वेगळा गट करणारे स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी, मुनीज जमादार, प्रीती सुर्वे हे चार नगरसेवक अपात्र ठरल्याने या चार जागा रिक्त झाल्या होत्या. या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन जागा सेनेने मिळवल्याने सेनेचे संख्याबळ १४ झाले आहे. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार विषय समित्यांची निवडणूक झाली तर शिवसेनेचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे नियोजन, अर्थ, शिक्षण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, आरोग्य या विषय समित्यांच्या सभापतीपदांवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे अल्पमतात असलेल्या सत्ताधारी भाजपला कारभार करणे कठीण जाणार आहे.(प्रतिनिधी) उज्ज्वला शेट्ये : पुन्हा वन टू का फोर? रत्नागिरी नगर परिषदेच्या राजकारणात अनेकदा ‘वन टू का फोर’ राजकारण करण्यात यशस्वी झालेले उमेश शेट्ये विषय समिती निवडणुकीतही असाच राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी उज्ज्वला शेट्ये नगरसेवपकपदाचा राजीनामा देऊ शकतील किवा समित्यांच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहतील. तसे झाले तर दोन्ही बाजूचे बलाबल समान होऊन लॉटरी पध्दतीशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनाही सज्ज! विरोधकांंच्या या खेळीचा शिवसेनेलाही अंदाज आला आहे. याबाबतची राजकीय खेळी उलथवून टाकण्यासाठी सेना नेते तयारीला लागले आहेत. त्यासाठी शिवसेना पक्षादेश बजावणार की विरोधकांमधील कोणी अनुपस्थित राहील, याची व्यवस्था करणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सभापती पदांसाठी यावेळी लागणार ‘सोडत’
By admin | Updated: December 13, 2015 01:13 IST