खेड : तालुक्यातील वीस दिवसांपूर्वी झालेल्या वादळात ७४८ नुकसानग्रस्तांची ४४ लाख ६६,३८६ रुपयांची हानी झाली असल्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील १६६हून अधिक गावांना त्याचा फटका बसला होता. अवकाळी वादळी पावसामुळे फळझाडे व मोठे वृक्ष यांची पडझड होऊन घरे, गोठा, शौचालये, शाळा, चक्की, दुकान, देऊळ, अंगणवाडी, बेकरी, हॉटेल समाजमंदीर, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानशेड यांना नुकसानीचा फटका बसला होता. सुरुवातीला ५५ गावांतील ६१० आपद्ग्रस्तांचे ३३ लाख २६ हजार ९१६ रुपयांचे नुकसान झाले होते. उर्वरित नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी त्यावेळी अर्ज दाखल झाले नव्हते. मात्र पंचनामे झाल्यानंतर त्यात साडेअकरा लाखांनी वाढ झाली आहे. अंशत: नुकसान झालेल्या ६६५ घरांचे ३० लाख ८२ हजार २८, पूर्ण घरांचे १ लाख ७२ हजार १०, अंशत: नुकसान झालेल्या ४० गोठ्यांचे १ लाख २४ हजार ४१९ रुपये, ९ दुकानांचे २ लाख ७८ हजार ७६० रुपये, शौचालय, शाळा, देऊळ, बेकरी, कंपनी, स्मशानशेड, समाजमंदीर, ग्रामपंचायत कार्यालय, गिरण यांचे ८ लाख २० हजार १६९ रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस अवेळी पडला व पहिल्या अवकाळी पावसाने सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासकीय यंत्रणेने चोख काम बजवावे अशी मागणीही तालुक्यातून होत आहे. महसुली नुकसानीचा आकडा तयार झाला असला मदत त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचवावी असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
खेड वादळातील नुकसान वाढले
By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST