चिपळुणात युवासैनिकांनी वाचविले दोघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:52 PM2018-10-07T22:52:51+5:302018-10-07T22:52:55+5:30
चिपळूण : दिवा पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नंदूरबार येथील एक ज्येष्ठ नागरिक धक्का लागून थेट बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्मवर आढळला. रेल्वेतून प्रवास करणाºया युवासैनिकांनी चिपळूण येथील युवासेना प्रमुख उमेश खताते यांच्याशी हेल्पलाईनवरून तत्काळ संपर्क साधला. काही मिनिटात युवासैनिक सावर्डे रेल्वे स्थानकावर पोहोचले व त्या जखमी नागरिकासह त्याच्या पत्नीला डेरवण रुग्णालयात दाखल करुन त्यांना जीवदान दिले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सावंतवाडी दिवा पॅसेंजरमधून शनिवारी नंदूरबार येथील शांताराम मुकणे व त्यांची पत्नी पार्वती मुकणे हे प्रवास करत होते.
रेल्वे संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आली असता शांताराम मुकणे यांना कोणाचा तरी धक्का लागला आणि थेट रेल्वेमधून बाहेर फेकले गेले. सुदैवाने रेल्वे स्थानकाजवळच ते पडले. त्यामुळे काही प्रवाशांनी त्यांना तत्काळ पुन्हा रेल्वेत घेतले. त्याच रेल्वे डब्यातून राजापूर येथील शिवसैनिक ओंकार नारकर व मनोज सार्दळ हे प्रवास करत होते. मुकणे हे प्रचंड जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून व नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या दोन्ही शिवसैनिकांनी तत्काळ चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख खताते यांच्याशी युवासेना हेल्पलाईनवर संपर्क साधला.
युवासेना तालुकाप्रमुख खताते यांनी सावर्डे येथील युवासेना उपतालुकाप्रमुख सागर सावंत यांच्याशी संपर्क साधून तातडीने सावर्डे रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या सूचना दिल्या. सावंत यांनी सहकारी भूपेश सावर्डेकर व रुपेश घुले यांना बरोबर घेऊन सावर्डे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत दिवा पॅसेंजर स्थानकावर धडकली होती. नंदूरबारमधील जोडप्याला शोधून काढले व स्वत:च्या गाडीतून थेट डेरवण रुग्णालयात आणून दाखल केले.
विशेष म्हणजे हे जोडपे कोण? कुठून आले? नाव काय? हे युवासैनिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर समजले. जात, धर्म बाजूला ठेवून एका फोनवर युवक काम करत होते व त्या जोडप्याला जीवदान दिले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका जोडप्याला जीवदान दिल्याबद्दल युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.