रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या जातीच्या भातासाठी पाऊस चांगला आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात आले आहे. पैकी ४० टक्के हळव्या जातीचे, ४० टक्के निमगरवे तर २० टक्के गरव्या जातीच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. पैकी हळव्या जातीचे भात काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आले आहे.
त्याचबराेबर पसवलेल्या भाताने लोंब्या टाकल्या असून त्या दुधावस्थेत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे फुलोरा झडून जाण्याची शक्यता आहे. पसवलेल्या भातामध्ये दाणा तयार झालेला नाही. अति पावसामुळे दाणा काळपट पडून पोचट होणार आहे. सलग दोन आठवडे कडाक्याच्या उन्हामुळे कोरड्या झालेल्या भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. कडक उन्हामुळे वाळत आलेल्या पिकाला त्यामुळे जीवदान मिळाले आहे.
वास्तविक, यावर्षी लवकर झालेल्या पावसामुळे भातलागवड वेळेवर पूर्ण झाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. कडक उन्हामुळे काही ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. निळे फुंगेरे, काटेरी भंगेरे तसेच पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करून कीडरोग आटोक्यात आणला आहे.
मुसळधार पावसामुळे हळव्या भातपिकावर परिणाम झाला आहे. पावसाचे प्रमाण सतत राहिले तर मात्र हळवे भातपीक धोक्यात येईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.