राजापूर : राज्याच्या कठीण आर्थिक स्थितीत कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले समर्थन दिलेले असतानाच आता मुंबईस्थित तालुकावासीय आणि मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी प्रकल्पासाठी राजापूरवासीयांना आंदोलनाची हाक दिली आहे.
राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प एका माणसाच्या हट्टामुळे थांबल्याची तोफ डागत येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावरच प्रचंड मोर्चा काढण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी तालुक्यातील सर्वपक्षीयांना केले आहे. काही महिन्यांपूर्वी तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी जे राजकीय पक्ष विरोध करीत होते, त्यापैकी शिवसेना वगळून इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता समर्थनासाठी चढाओढ लागलेली दिसत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जनतेचा प्रचंड पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.
नारकर पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून रिफायनरी प्रकल्प कोकणातून हद्दपार होण्याच्या बातम्या ऐकून मन विषण्ण होत आहे. शिवसेनेच्या हट्टापायी कोकण एका चांगल्या प्रकल्पाला व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींना मुकणार आहे. हा प्रकल्प कोकणातून जाऊ नये, यासाठी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याशिवाय आता पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतही चाकरमान्यांची ताकद कमी नाही व रत्नागिरीतील लोकांना यायला पण जास्त अंतर नसल्याने लवकरच या मोर्चाचे आयोजन करावे, असे नारकर यांनी म्हटले आहे.