लांजा : लांजा कुवे शहरातील ग्रामदैवतांच्या चालीरीती, रुढी, परंपरांचा मान ठेवून आणि लोकभावनेचा आदर करूनच वाड्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी हा निर्णय नागरिकांवरच सोपविण्यात आला असून त्या त्या वाडीचा जनमताचा निर्णायक कौल जाणून घेऊनच बदल केला जाईल. यासाठी कोणतीही तत्काळ कार्यवाही होणार नसल्याचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी विशेष सभेत स्पष्टपणे जाहीर केले.
शासन निर्णयानुसार जातिवाचक असलेल्या वाड्यांची नावे बदलण्याची कार्यवाही संपूर्ण राज्यात सुरू आहे. लांजा नगरपंचायत हद्दीत ही प्रक्रिया हाताळताना जोरदार वादंग निर्माण झाले होते. भाजपचे गटनेते संजय यादव यांनी नावे बदलण्याला आक्षेप घेतला. सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीने ही प्रक्रिया अद्यापही सुरू असून, कोणताही निर्णय यावर झालेला नसल्याचे स्पष्ट केले होते. विरोधकांनी या विषयावरून केवळ नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी यासाठी जनमताचा कौल मागविला होता. ही प्रक्रिया लांजा कुवे शहरात राबविताना सर्व नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी सर्व नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठीची विशेष सभा बुधवारी ८ सप्टेंबरला झाली. या सभेत नागरिकांच्या मतानुसार निर्णय घेऊन त्यावर ही प्रक्रिया हाताळण्याचे ठरले. केवळ जातिवाचक वाड्यांचीच नावे बदलली जावीत, हा शासनाचा हेतू असल्याचे नगराध्यक्ष बाईत यांनी सांगितले.
नागरिकांच्या सूचना व हरकती प्राप्त झाल्यानंतरच प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले असल्याचेही बाईत यांनी सांगितले. अपुऱ्या माहितीच्या आधारे आपल्या अज्ञानापोटी जनतेला भडकवण्याचे काम कोण करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.