राजापूर : तालुक्यातील भू-कोतापूर मार्गावर तेरवण बौद्धवाडी येथे रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू सापडले असून, वनविभागाने बिबट्याच्या पिलाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे.
येथील संदीप जाधव हे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात येत हाेते. भू - कोतापूर मार्गावरील तेरवण बौद्धवाडी येथे रस्त्यावर त्यांना एक बिबट्याचे पिल्लू दिसले. त्यांनी तेरवण पोलीस पाटील तसेच वनविभाग यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर वनविभागाचे वनपाल एस. व्ही. घाडगे, सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये हे तेरवण येथे दाखल झाले.
त्यांनी बिबट्याच्या पिलाला सुरक्षित पिंजऱ्यात बंद केले. साधारणत: एका महिन्याचे नर जातीचे बिबट्याचे पिल्लू असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी तेरवण पोलीस पाटील गजानन बाईंग उपस्थित होते.