लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंडरपास रस्त्यामुळे सर्व्हिस रोडला पादचारीपथ पुरेसा रुंद उभारण्याची गरज आहे़ यावर्षी तुळशीखिंड व आंबेत म्हाप्रळ पूल वाहतुकीस बंद असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील भूस्खलनामुळे कोकणाचे दळणवळण बंद होऊ शकते़ त्यामुळे तातडीची तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन अभियंते व प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
मुंबई-गाेवा महामार्गावरील पोलादपूर शहरातील अंडरपास रस्ता आणि कशेडी घाटातील डोंगर उभे कापल्याने मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक भूस्खलन होण्याची शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पोलादपूर शहर व कशेडी घाटाचा पाहणी दौरा केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बांगर, महाड उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंता आकांक्षा मेश्राम, ‘एलऍण्डटी’ कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जगमोहन नायडू उपस्थित होते.
कशेडी घाटातील धामणदिवीपासून भोगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्यालगतचा डोंगर उभा कापण्यात आल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प होणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढे भूसंपादन करण्यात येऊन डोंगरातील भूस्खलन महामार्गापर्यंत दरडी पोहोचणार एवढ्या अंतरापर्यंत असावे, असे सांगितले़ अभियंता बांगर यांनी या डोंगरातील जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्याचे सांगितले. यावेळी भूसंपादन अधिकारी तथा महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी प्रस्ताव आपणास प्राप्त झाल्यास पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.
------------------------------
मुंबई-गाेवा महामार्गावरील वाहतूक पावसाळ्यात बंद पडणार आहे़ या पार्श्वभूमीवर कशेडी भागाची खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पाहणी केली़