शृंगारतळी : यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने उन्हाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, नदी-नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. यामुळे पातळी वाढून काही प्रमाणात का होईना पाणीटंचाईवर मात करता येईल, अशी आशा नागरिकांमध्ये पल्लवीत झाली आहे. मात्र, शृंगारतळीसारखे ठिकाण बंधारे बांधण्याच्या लोकचळवळीपासून अद्याप वंचित असल्याचे दिसत आहे. बंधारे बांधण्याच्या दृष्टीकोनातून शृंगारतळीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्हाभरात शासनाचे सर्व विभाग व राजकीय पदाधिकारी बंधारे बांधण्याच्या कामात गुंतलेले आहेत. गुहागर तालुक्यातही प्रशासन, राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने १००० बंधारे बांधण्यात येणार आहेत. बंधारे बांधण्यासाठी खासकरून कृषी विभागाला शेवटपर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. शासनाचे इतर विभागही बंधाऱ्यांसाठी पाण्यात उतरतील. मात्र, कृषी विभागाला याकडे जादा लक्ष द्यावे लागेल, तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकेल. गुहागर तालुक्यात १२२ गावात एक हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले, तर प्रत्येक गावातील नदी - नाल्यावर आठ ते नऊ बंधारे बांधावे लागणार आहेत. त्यासाठी ६५ ग्रामपंचायतींना लोकचळवळ उभी करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. गुहागर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ शृंगारतळी मात्र बंधाऱ्यापासून अद्याप वंचित असल्याचे चित्र आहे. तळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला दक्षिण - उत्तर हंगामी नद्या वाहतात. या नद्यांच्या परिसरातील जमिनीत मुबलक पाणी आहे. याठिकाणच्या विहिरी ही उन्हाळ्यात पाण्याने डबडबत असत. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांपासून विहिरींच्या पाण्याची पातळी घटून तळ दिसू लागला आहे. कारण दिवसेंदिवस येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. मोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. कूपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. सध्या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर असणाऱ्या विहिरी व कुपनलिकांमधून संपूर्ण शृंगारतळीला पाणी पुरवठा होत आहे. मोडका आगर धरणात मुबलक पाणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीची जलस्वराज्य पाणीपुरवठा कोटीची योजना बंद पडलेली आहे. रत्नागिरी गॅस पॉवरकडे जाणाऱ्या पाईपलाईनमधून मिळणारे पाणीही आता बंद झाले आहे. त्यामुळे शृंगारतळी येथील वाढत्या लोकवस्तीमुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे कौंढर रोड, वेळंब रस्ता, रोशन मोहल्ल्यातून वाहणारी हंगामी नदी व बाजारपेठेतील कोकणरत्न हॉटेलजवळून वाहणाऱ्या नदीवर कायमस्वरुपी बंधारे बांधण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने शृंगारतळीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शृंगारतळी वेळंबरोड येथील नदीचे पाणी सुकण्यापूर्वी येथे बंधारे बांधण्याची गरज आहे. (वार्ताहर)लाभदायक : पाणीटंचाईवर मात करता येणे शक्यपावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे सावट पसरणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे रौद्ररूप लक्षात घेऊन शासनाने गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होऊन पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे. पाणी अडविल्याने पाणीटंचाईवर काही अंशी मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे बंधारे लाभदायक ठरणार आहेत.ग्रामस्थांची अनास्थारत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावात ग्रामस्थांची अनास्था समोर येत आहे. त्यामुळे या गावात अजूनही बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतलेली नाही.
लोकचळवळीचा अभाव
By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST